बार्शी : फिफ्टी प्लस कोट्यामध्ये पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार विजयी व्हावे, मी पुन्हा बार्शीत श्री भगवंताला पेढे वाहण्यासाठी येईन, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
बार्शी येथ भाजपचे पदवीधर मतदारसंघातील डॉ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक मतदारसंघातील कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. राजेंद्र राऊत, करमाळा-माढा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील, पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी रोंगे, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले, उपसभापती संतोष निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड यांच्यासह अनेक शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.
मंत्री पाटील पुढे म्हणाले की, मी तुमच्यामध्येच श्री भगवंत पाहत आहे. मला विश्वास नाही तर खात्री आहे की, पुणे मतदारसंघातील आपले दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. पुणे मतदार संघामध्ये तब्बल २५ लाख पदवीधर राहत असले तरी जेमतेम तीन लाख ८८ हजार पदवीधरांनी आपली नोंदणी केली. २१ लाख मतदारांनी नोंदणी केली नाही. प्रत्येकांनी नोंदणी करून मतदान करणे गरजेचे आहे. प्रत्येक निवडणुकीत दहा हजार मते बाद होतात ती होऊ नये म्हणून प्रयत्न करा. ८० टक्के मतदान करून घ्या, असा सल्लाही यावेळी पाटील यांनी उपस्थितांना दिला.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार हे पदवीधरांना न्याय देणार सरकार असून पदवीधरांचे प्रश्न माहीत असणारे व शिक्षणाशी निगडित असणारे उमेदवार असल्यामुळे डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देऊन विजयी करा, असे आवाहन केले. आ. राजेंद्र राऊत यांनी दोन्ही उमेदवारांच्या मागे उभे राहून त्यांना मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगितले.