सोलापूर ः जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांची तयारी पूर्ण झाली आहे. त्याची तपासणी केंद्राच्या पथकाकडून होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.
सीईओ जंगम म्हणाले, गावात स्वच्छतेचे सातत्य टिकविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याने यापूर्वी अभियानात चांगली कामगिरी केली होती. जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत घटकनिहाय तयारी केली आहे. यासाठी सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची टीम कार्यरत आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील एक हजार 123 पैकी 35 ग्रामपंचायतीची निवड पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील कोणते गाव निवडायचे ते केंद्र शासनाची समिती एक दिवस अगोदर ठरवणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीकडून तयारी केली आहे.
गावातील सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन सुविधासाठी थेट निरीक्षणासाठी 120 गुण, ग्रामस्थांच्या थेट प्रतिसादासाठी 100 गुण, गावातील सुविधांच्या वापराबाबत 240 गुण, प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणा दरम्यान 540 गुणांची प्रश्नावली असणार आहे. गुणांच्या आधारे मूल्यांकन होणार आहे.