सोलापूर : ब्राह्मण सामाजिक-व्यावसायिक संघटना तसेच भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरात परशुराम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही शहरातील ब्राह्मण समाजाने मोठ्या संख्येने या उत्साहात सहभाग घेतला. दत्त चौकातून निघालेल्या मिरवणुकीत तरुण-तरुणींचे लेझीम पथक आणि महिलांचे भजनी मंडळ यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
पारंपरिक वाद्यांसह मर्यादित आवाजात आयोजित मिरवणुकीत 500 गणवेशधारी स्त्री-पुरुष आणि मुले लेझीम व देशी खेळ तन्मयतेने खेळताना दिसले. मिरवणुकीची सांगता चार हुतात्मा चौकात सायंकाळी सात वाजता झाली. यावेळी भगवान परशुरामांची 51 ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात प्रतिष्ठापना करण्यात आली. रात्री 10 वाजता विसर्जनाचा सोहळा झाला. उत्सवात डाळ व पन्ह्याचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. ज्यात सुमारे तीन हजार समाज बांधवांनी तसेच परशुराम भक्तांनी सहभाग घेतला. भगवान परशुरामाची महती सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट या उत्सवाने यशस्वीपणे साध्य केले.