सोलापूर : जमिनीच्या वाटणीवरून पुतण्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर काँगे्रसचे तालुकाध्यक्ष हरिष गुरूनाथ पाटील आणि त्यांचा मुलगा विकास हरीष पाटील यांच्या विरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जुळे सोलापुरातील रेणुका नगर येथे हरिष पाटील हे राहतात. जमिनीच्या वाटणीवरून त्यांच्या घरी सोमवारी (दि. 9) रात्री त्यांचे भाऊ सुरेश पाटील यांचा मुलगा विनोद पाटील यांच्यासोबत वाद सुरू होता. रात्री साडेअकराच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर हरिष पाटील आणि विकास पाटील यांनी विनोद यास मारहाण केली.
विनोद याचे लिव्हरचे ट्रान्सप्लांट झाले आहे. तरी त्यांच्या पोटात लाथ मारली. त्यांचा मोबाईलही फोडला. जमिनीची वाटणी आणि जागेचे मिळालेले पैसे यावरून बापलेकांनी विनोद यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद विनोद यांनी विजापूर नाका पोलिसात दिली. त्यानुसार हरिष पाटील आणि विकास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच मार्केट यार्डात दुकानाचे शटर उचकटून रोख 15 हजार रुपयांची चोरी झाली आहे. मेहमुद युसुफ नालबंद यांचे मार्केट यार्डात मिरची विभागात गाळा नंबर आठमध्ये डी. के. कंपनी नावाचे दुकान आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दुकान बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यात ठेवलेले रोख 15 हजार रुपये चोरून नेले. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील रहदारीचे ठिकाण असलेल्या भैय्या चौकातून दुचाकी चोरीला गेली आहे. गजानन नारायण घुगरे (रा. नवी पेठ, सोलापूर) यांनी सहा जूनला त्यांची दुचाकी (क्र. एम. एच. 13 ई. जी. 1958) ही भैय्या चौकात हॅण्डल लॉक करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या मदतीने दुचाकी चोरून नेली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.