सोलापूर ः दहावी, बारावीचे निकाल लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर करिअर मार्गदर्शन घेण्यासह कलचाचणी करण्यात विद्यार्थी, पालक सहभाग नोंदवत आहेत. नेमक्या याच काळात विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसाठी बोटांच्या ठशावर आधारित बहुविध बुद्धिमत्ता चाचणीचे (डीएमआयटी) प्रकार वाढत आहेत. अशी चाचणी अशास्त्रीय असून या पद्धतीने कलचाचणीविषयक भूलथापांना विद्यार्थी व पालकांनी बळी पडू नये, असे आवाहन समुपदेशक, मानसशास्त्रज्ञांनी केले आहे.
सर्वसाधारणपणे करिअर मार्गदर्शन किंवा मानसशास्त्रीय पद्धतीने करिअरची निवड ही व्यक्तीला आयुष्याची योग्य दिशा दाखवण्याची खरी पद्धत आहे. परंतु या पद्धतीला फाटा देत काही लोकांकडून अशास्त्रीय पद्धतीने अंगठ्याच्या ठश्यांवरून करिअर मार्गदर्शन करण्याचे अशास्त्रीय प्रयोग केले जात आहेत. त्यासाठी पालकांशी गोड बोलून, त्यांना आकर्षित करून हजारो रुपये खर्च करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.
करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली बोटांच्या ठशावर आधारित बहुविध बुद्धिमत्ता चाचणीचा भलताच प्रकार करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमता, कल समजून न घेता त्यास अंगठ्याचे ठसे मागत आहेत. बहुविध बुद्धिमत्ता चाचणी (डीएमआयटी) या ठशांवर आधारित तथाकथित चाचणीद्वारे त्याच्या भविष्याचा सविस्तर रिपोर्ट तयार करीत आहेत. त्यासाठी हजारो रुपयांची मागणी केली जात आहे. त्यातून संबंधित विद्यार्थ्यांस नेमके आयुष्यात काय करायचे, याचा काहीही बोध होत नाही. ही अतिशय चिंतेची बाब बनत चालली आहे. मुळातच असा अहवाल शास्त्रीय पद्धतीवर आधारित नसल्याने मार्गदर्शक गोड बोलून अहवाल हाती देऊन मोकळा होतो.
समुपदेशन, संवादाची पद्धतच योग्य
करिअर कॉन्सिलिंगमध्ये विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय व प्रमाणित अशा बुद्ध्यांक तपासणी, कलचाचणी, व्यक्तिमत्व चाचणी व समुपदेशन या पध्दतींचा वापर केला जातो. त्यातून विद्यार्थ्यांना करिअरची दिशा ठरवण्यासाठी मदत केली जाते. विद्यार्थ्यांच्या समस्यांचा नेमका अभ्यास करुन सारासार विवेकानुसार योग्य मार्गदर्शन केले जाते. समुपदेशन व संवादाच्या मदतीने मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक हे या शास्त्रीय पध्दतीचा अवलंब करतात.