टेंभुर्णी : चारचाकी हॉटेलसमोर लावून चहा पिऊन येईपर्यंत गाडीची काच फोडून मधल्या सीटवर ठेवलेली एक लाख रुपयाची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना टेंभुर्णी शहरात अकलूज चौकातील जय शिवशंकर हॉटेलसमोर घडली.
याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, माढा तालुक्यातील वरवडे येथील नागनाथ अरुण मेनकुदळे (वय 38) यांनी घटनेदिवशी मंगळवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास बँक ऑफ बडोदा टेंभुर्णी शाखेतून एक लाख काढले होते. ते पैसे बॅगेत ठेऊन त्यांनी ती बॅग चारचाकीमध्ये (एमएच 13-सीएस 7255) ठेवली होती. यानंतर ते टेंभुर्णीतील अकलूज चौकात जय शिवशंकर हॉटेलसमोर गाडी लॉककरून चहा पिण्यासाठी गेले. ही संधी साधून चोरट्यांनी बोलेरो गाडीची काच फोडून मधल्या सीटवर ठेवलेली एक लाख रुपयाची बॅग हातोहात लंपास केली.
याबाबत नागनाथ मेनकुदळे यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास टेंभूर्णी पोलिस ठाण्याचे हवालदार शिवाजी जाधव हे करीत आहेत.