सोलापूर : मुंबईतील महागडा फ्लॅट कमी किमतीत देतो तसेच स्काय भारत एव्हिएशन प्रा. लि. कंपनीच्या कामात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील व्यावसायिकाची एक कोटी ३२ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र रुद्रप्पा आडगे (रा. कर्णिकनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अश्विनी महेश ओझा, सिद्धांत महेश ओझा, नसीम रईस हाश्मी आणि कृष्णप्रसाद (सर्व रा. मुंबई) अशी संशयितांची नावे आहे.
फिर्यादी आडगे यांची जुलै २०२४ मध्ये सोलापूर शहरातील पार्क चौकातील एका हॉटेलमध्ये संशयितांची ओळख झाली. संशयितांनी मुंबईतील बांद्रा येथील निरो बिल्डिंगमधील फ्लॅट कमी किमतीत देतो म्हणून त्यांच्याकडून ३५ लाख रुपये घेतले. त्यानंतर मुंबईतील स्काय भारत एव्हिएशन प्रा. लि. या कंपनीच्या कामात भागीदारी देण्याचे आमिष दाखवले. यासाठी ॲडव्हान्स म्हणून ९७ लाख ६७ हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी आडगे यांना फ्लॅट दिला नाही, तसेच कामात भागीदारीही मिळाली नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आडगेंच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विकास देशमुख करीत आहेत.