theft Pudhari
सोलापूर

Solapur Crime: तिप्पेहळ्ळीत वाड्यावस्त्यांवर चोरट्यांचा धुमाकुळ

पोलिसांकडे तातडीने तपासाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : तिप्पेहळ्ळी (ता. सांगोला) गावातील शिववस्ती व सांगोलकर वस्ती परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून ग्रामस्थांना संरक्षण द्यावे, अशी मागणी तिप्पेहळ्ळी ग्रामस्थांनी सांगोला पोलिस ठाण्याकडे केली आहे.

चोरट्यांनी विठोबा निवृत्ती नरळे यांच्या घरी नातेवाईक आल्यानंतर हायवेवर त्यांची गाडी थांबलेली असताना चोरट्यांनी गाडीवर हल्ला केला. यावेळी रोख रक्कम, महिलांच्या अंगावरील सुमारे २४ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच दोन मोबाईल असा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेत संबंधित पती-पत्नीला मारहाण झाल्याचेही ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

यानंतरही परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावणे, मोटारसायकली चोरीस जाणे, शेतातील एस.टी.पी. व विहिरीवरील मोटारी चोरीला जाणे, तसेच शेळ्या-बकऱ्यांची चोरी होण्याच्या घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शेळी चोरीबाबतही सांगोला पोलिस ठाण्यात अर्ज देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चोरीच्या पूर्वीच्या घटनांचा अपेक्षित तपास न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून पोलिसांवरील विश्वास कमी होत चालल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिक तक्रार करण्यासही पुढे येत नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

या वाढत्या चोरीच्या प्रकारांना आळा घालून दोषींचा तातडीने शोध घेऊन चोरीचा तपास पूर्ण करावा व ग्रामस्थांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. १५ दिवसांच्या आत चोरीच्या घटनांचा तपास करून योग्य कारवाई न झाल्यास शिववस्ती व सांगोलकर वस्तीतील ग्रामस्थांच्या वतीने मिरज-पंढरपूर मार्गावर तिप्पेहळ्ळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सदरचे निवेदन स. पो. नि. सागर पाटील यांनी स्वीकारले. यावेळी आपली कोणतीही तक्रार असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. यापुढील काळात भुरट्या चोऱ्या आणि गुन्हेगारींना आळा बसवण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करेल, असा विश्वास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT