नरखेड : मोहोळ तालुक्यातील उत्तर भागातून वाहत असलेल्या सीना व भोगावती नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील दोन्ही बाजूचे संरक्षक लोखंडी पाईप व सिमेंटचे कठडे महापूर आल्याने मोडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी संबधित विभागाने अपघात होण्यापूर्वीच संरक्षक कठडे व लोखंडी पाईप बसवावेत, अशी मागणी प्रवाशी व वाहनधारकांतून जोर धरत आहे.
सीना नदीवर बोपले, अनगर-नरखेड, मलिकपेठ, आष्टे या ठिकाणी तर भोगावती नदीवर देगाव (वा), डिकसळ, भोयरे याठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारण्यात आले आहेत. चालू वर्षी पावसाळ्यामध्ये सप्टेंबर महिन्यात सीना व भोगावती या दोन्ही नद्यांना दोन ते तीन वेळा महापूर आला होता. या महापुरामुळे सिना व भोगावती नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील दोन्ही बाजूला असलेले संरक्षक कठडे व लोखंडी पाईप मोडून पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम चालू झाला असून या भागातील ऊस नेण्यासाठी या बंधाऱ्याचा वापर करावा लागत असून बैलगाडी, ट्रॅक्टरगाडी, ट्रॅक्टर, ट्रक या मोठ्या वाहनांमधून जास्त प्रमाणात ऊस नेला जातो. ऊस वाहतूक व इतर लहान मोठी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहनधारकांना व प्रवाशांना या बंधाऱ्यावरून जात असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मोहोळ, सोलापूर, वैराग, अनगर, माढा यासह आदि भागात कमी वेळेत जाण्यासाठी सीना व भोगावती नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील रस्ते महत्वाचे असल्याने वाहनांची ये-जा दिवस रात्र चालू असते. डिकसळ, नरखेड -अनगर हे बंधारे वगळता इतर कोल्हापूर पध्द्तीचे बंधारे मागील पंचवीस ते तीस वर्षापूर्वी बांधण्यात आले असून वरचेवर हे बंधारा प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे. या बंधाऱ्यावरून एका वेळेस एकच वाहन जात आहे.
या बंधाऱ्यावर प्रवाशाच्या सोयीसाठी संरक्षक लोखंडी पाईप व सिमेंटचे कठडे बांधण्यात आले होते. मात्र सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरामुळे सीना व भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील दोन्ही बाजूचे पाईप व कठडे मोडून पडले आहेत.त्यामुळे प्रवाशांना व वाहनधारकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यातच सध्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे .
यापूर्वी अनेक लहान मोठे अपघात या बंधाऱ्यावर घडले आहेत. याची कल्पना संबधित प्रशासनालादेखील आहे.रात्री अपरात्री तर बंधाऱ्यावरून येजा करताना खड्डे असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. संबंधित विभागाचे अधिकारी डोळे असून आंधळ्याची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. पाटबंधारे विभागाचे तातडीने लक्ष घालून संरक्षक कठडे व लोखंडी पाईप बसवून होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशातून केली जात आहे.