सोलापूर : अक्कलकोट रोडवर एका घरात सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी छापा टाकला. तेथून पीडित महिलांची सुटका करून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर येथील साक्षी रेसिडेन्सी येथील एका राहत्या घरात कुंटणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी ( दि. ८) दुपारी सदर ठिकाणी घरात बोगस ग्राहक पाठवून बातमीची खात्री केली. त्यानंतर दुपारी तीन वाजता छापा टाकण्यात आला. तेथे नंदिनी गोरख कांबळे (वय ५०, रा. ब्लॉक नंबर १, साक्षी रेसिडन्सी, अक्कलकोट रोड, सोलापूर) ही राहते घरात पिडीत महिलांना पैश्याचे अमिष दाखवून डांबून ठेवून तिला वेश्याव्यवसाय करणेस भाग पडत असल्याचे निदर्शनास आले. तिला ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस आयुक्त एम.राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहा-पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर, रियाज प्यारे, सत्तार पटेल, सुशिला नागरगुजे, अरुणा परब, सिमा खोगरे, उषा मळगे, दादा गोरे यांनी पार पाडली.