सोलापूर : अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि नंतर अटकपूर्व जामिनासह अडचणीची ठरणारी कायद्यातील कलमे न लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने तब्बल २५ लाखांची लाच मागितली. त्यातील ५ लाख ५० हजार रुपये घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदारांसह त्यांचे आई, वडील, भाऊ व इतरांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी अनिल शिंदे (पोलीस हवालदार, ब.नं. १६५९, नेमणूक नातेपुते पोलीस ठाणे, सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज) याने स्वतःसाठी व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख रुपयांची लाच मागितली.
सापळा रचून कारवाई
२८ ऑगस्ट रोजी माळशिरस येथील पालखी महामार्गावरील ब्रिजखाली साडेपाच लाख रुपयांची लाच घेताना आबा सावळा वळकुंदे (वय ४८, रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय ३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) यांना पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नीता मिसाळ, पोलिस निरीक्षक मिथुन म्हात्रे, राजेश बाटे, प्रवीण तावरे, आश्विन कुमकर, दगडू सोनवणे, चंद्रकांत कदम यांनी पार पाडली.