सोलापूर : गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक राहिल्याने बाजारपेठेत उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणेशमूर्तींसह पूजा आणि सजावटीसाठी लागणाऱ्या पितळी साहित्याला मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नक्षीदार व सुबक पितळी गणेशमूर्ती विविध आकारांत बाजारात दाखल झाल्या आहेत.
पितळी गणेशमूर्ती एक इंचापासून दीड फुटापर्यंत आहेत. या मूर्ती कायमस्वरूपी ठेवून पूजा केली जाते. गणेशमूर्तींच्या जोडीने उरळी, पंचारती, धूपारती, कापूर पट्टी, पितळी लटकन समई, एकवाती डिझाईन दिवे, एकारती, घंटी, गदा, त्रिशूळ, चक्र, पितळी शृंगी, पितळी पाळणा, तबक, पंचपाळ, करंडे आणि नंदादीप यांचीही खरेदी वाढली आहे.
गणेशोत्सवातील सजावटीसाठी यंदा पितळी बैलगाडी, हत्ती, गाय, वासरू यांसह विविध प्राण्यांच्या आकर्षक प्रतिकृती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. पूजेसाठी पितळी ताटांनाही मागणी आहे. पितळी समई पाच इंचांपासून तब्बल पाच फुटांपर्यंत उपलब्ध असून समईंना सजावटीसाठी पसंती मिळत आहे. शिखरावरील कळसही पितळीत उपलब्ध आहेत. पितळेच्या किंमतीत २५ टक्के वाढ झाली आहे. पण दरवाढीनंतरही पितळी वस्तूंच्या मागणीत फारशी घट झालेली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पारंपरिक पितळी दिव्यासह या अनोख्या डिझाईन्सना मागणी आहे.