मोहोळ : अपघातात गंभीर जखमी होऊन ब्रेनडेड झालेल्या युवकाचे त्यांच्या कुटुंबाच्या संमतीने अवयवदान करण्यात आले. त्याचे दोन मुत्रपिंड इतर गरजू रुग्णांच्या कामी येणार आहे.अक्षय पांडुरंग खांडेकर (वय २८, रा. मनगोळी, सध्या वडवळ, ता. मोहोळ) असे अवयवदान केलेल्या युवकाचे नाव आहे.
मोहोळ-पंढरपूर पालखी मार्गावर १० नोव्हेंबर रोजी रात्री दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात अक्षय पांडुरंग खांडेकर ( रा. मनगोळी, सध्या वडवळ ता. मोहोळ) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या निदर्शनास आले की, अक्षय ब्रेनडेड झाला आहे. ही बाब समजल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या कठीण प्रसंगातही डॉक्टरांनी आणि आरोग्यदूत सूरज जम्मा यांनी नातेवाईकांचे समुपदेशन केले. अक्षयच्या अवयवदानामुळे इतर गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, याची जाणीव करून देत त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेण्याचे आवाहन केले. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही अक्षयच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांशी चर्चा करून त्याचे अवयवदान करण्याचा माणुसकी जपणारा निर्णय घेतला. अक्षयच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मृत्यूनंतरही त्याच्या माध्यमातून इतर गरजू रुग्णांना जीवनाची नवी आशा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अक्षयचा पार्थिव देह त्याच्या मूळगावी मनगोळी येथे आणण्यात आला. मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अंत्यविधीसाठी मोहोळ पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.