सैफन पटेल, हुजूर पटेल  Pudhari
सोलापूर

Solapur Accident | बोरामणी नाका येथे दुचाकी ट्रकखाली सापडून २ जण जागीच ठार

सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Bike Truck collision Solapur

कासेगाव : सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे शुक्रवारी (दि.२७) सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह मागील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरामणी गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरामणी येथील रहिवासी सैफन फरीद पटेल (वय ४३) व हुजूर अल्लाउद्दीन पटेल (वय ३५) हे दोघेही व्यवसायाने आचारी होते. स्वयंपाकाच्या ऑर्डरसाठी ते सकाळी दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, बोरामणी नाका परिसरात पोहोचल्यावर त्यांनी समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

याच वेळी मार्केट यार्डकडून येणारा ट्रक (क्र. MH 04 BC 2910) अक्कलकोट रस्त्याकडे वळत होता. दुचाकीचा वेग आणि ट्रकच्या वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकी (क्र. MH 13 BT 5822) थेट ट्रकच्या मार्गात आली. परिणामी दुचाकी ट्रकखाली सापडून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार व मागील प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही तत्काळ कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात पाठविण्यात आले.

या दुर्घटनेची बातमी समजताच बोरामणी परिसरात शोककळा पसरली. दोघेही स्वभावाने मनमिळाऊ व कष्टाळू असल्याने परिसरात त्यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सैफन फरीद पटेल यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा व आई असा परिवार आहे, तर हुजूर अल्लाउद्दीन पटेल यांच्या पश्चात पत्नी तसेच आई-वडील असा परिवार आहे. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारी त्यांच्या पार्थिवावर गावात शोकाकुल वातावरणात दफनविधी पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT