सोलापूर : शहर-जिल्ह्यातील बावीस रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमीच झाला आहे. सध्या 5679 इतकेच रक्तांच्या बॅगा रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक आहेत. ही संख्या शहर-जिल्ह्याच्या तुलनेने खूपच कमी आहे. काही रक्तगटाचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे.
गेल्या काही दिवसांपासून सण, उत्सवाचा काळ असल्यामुळे स्वेच्छेने रक्तदान करणार्यांची व शिबिरांची संख्याही कमी झाली आहे. रक्त साठा वाढवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे. रक्तपेढ्यांनी विविध तरुण मंडळ, संघटना आणि विविध शाळा, महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधून रक्त संकलन वाढवण्याचे आवाहन केले आहे. सर्पदंश व मूत्रपिंडाने त्रस्त रुग्णांना डायलेसीस करावे लागते, थॅलेसिमिया या आजाराने ग्रस्त बालके, कर्करोगग्रस्त रुग्ण, गरोदर महिला व विविध आजारांवरील ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णांना रक्त लागते. शिवाय, पावसाळ्यानंतर डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यासाठी रक्ताची मागणीही वाढली आहे. शहर-जिल्ह्यातील रक्तपेढ्यांनी सामाजिक राजकीय संघटनांसह शैक्षणिक क्षेत्रातील संस्था यांना संपर्क साधून रक्तदान करण्याची गरज आहे.
शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गरीब रूग्ण उपचारासाठी येतात. येथील रक्तपेढीमध्ये सध्या ए व एबी या रक्तगटाचा तुटवडा आहे. तसेच अन्य रक्तगटाचा अपेक्षित साठा नाही. या रक्तपेढीतून काही दिवसांपूर्वी आठशे रक्त व रक्त घटक रुग्णांना दिले. रक्तदानासाठी आवाहन केल्यावर फक्त 47 जणांनीच रक्तदान केले. शासकीय रुग्णालयात महामार्गावरील अपघातातील जखमी व प्रसुतीसाठी येणार्या गरोदर मातांना रक्ताची जास्त गरज भासते. अशा वेळेला गरीब रूग्णाला रक्त दिले जाते. शहर- जिल्ह्यातील रक्तदात्यांनी व संस्थांनी शासकीय रक्तपेढीत रक्तदान करणे गरजेचे आहे.डॉ. प्रदीप गाडगीळ शासकीय रक्तपेढी, सोलापूर