सोलापूर : सोलापूर शहर भाजपाला गटबाजीची लागण झाली आहे. पक्षाची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर त्याला आणखी ऊत आला आहे. शुक्रवारी सायंकाळी धनगर समाजातील सुमारे 70 कार्यकत्यार्ंंनी भाजपा कार्यालय गाठून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याच कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट आ. विजयकुमार देशमुख यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर घेत त्यांच्याकडेही राजीनामापत्र सुपूर्त केले. त्यामुळे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या विरोधात आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख यांचे गट सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
तडवळकर यांनी मंगळवारी कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राजीनामा सत्र वाढू लागले आहे. राम वाकसे, राज बंडगर, प्रा. देवेंद्र मदने, अभिषेक भाईकट्टी, केदार पुजारी, प्रशांत फत्तेपूरकर, प्रभाकर पडवळकर, संजय पुजारी, विनोद मोटे, शिवशंकर खताळ, उमेश कोळेकर, सिद्धेश्वर कणकी, विजय पुजारी, गंगाधर बंडगर, महेश खसगे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.