सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सोलापूर शहरासह पश्चिम भागात संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. हॉटेल बालाजी सरोवर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकांमध्ये निवडणुकीचे नियोजन, मतदारांशी संपर्क आणि प्रचार यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणनीतीबाबत कानपिचक्या दिल्या.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. पात्र मतदारांपर्यंत पोहोचणे, बूथनिहाय नियोजन करणे, मतदारांची माहिती संकलित करणे आणि प्रचार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविणे यावर भर देण्यात आला. भाजप-महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकांना भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, गणेश चिवटे, शशिकांत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समन्वयातून प्रचाराला गती देण्याच्या सूचना
सोलापूर शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोलापूर पश्चिम भागातील बैठकीतही निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन आणि संघटनात्मक तयारीवर चर्चा झाली. स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवून प्रचाराला गती देण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.