BJP Pudhari
सोलापूर

Solapur BJP: भाजपचे मिशन लोकसभा

टिळेकर, जगताप, पडळकरांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप 3 वर्षांचा अवधी असतानाच भाजपने आतापासूनच जातीय समीकरणांची जुळवाजुळव करत संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी नव्याने जिल्हा प्रभारांची नियुक्ती केली आहे. यात आ. योगेश टिळेकर, माजी आ. संजय जगताप, आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रथमच 2019 मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रुपाने माढा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले होते. परंतु बदलत्या राजकीय समीकरणात मोहिते-पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्याने 2024 मध्ये भाजपच्या नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. त्यामुळे सन 2029 मध्ये भाजपने माढा लोकसभा आपल्या ताब्यात घेण्यासाठी आतापासूनच कामाला लागली आहे.

सोलापूर जिल्हा पूर्व विभागाच्या प्रभारीपदी जतचे आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोलापूर पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी माजी आ. संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पडळकर हे धनगर समाजाचे असून, माढा, सोलापूर मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर संजय जगताप हे मुळचे काँग्रेसचे असून, जुलै 2025 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते पुरंदरचे माजी आमदार आहेत.

सन 2024 च्या लोकसभेत भाजपचे राम सातपुते यांचा पराभव झाला होता. ती जागा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी खेचून आणली होती. आता पुन्हा येत्या लोकसभेत भाजपला कमळ फुलविण्याचे आव्हान राहणार आहे. सोलापूर शहराच्या प्रभारीपदी भाजपने 13 एप्रिल रोजी ॲड. अर्चना चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यात बदल करुन पुन्हा शहराची जबाबदारी ही आ. योगेश टिळेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. योगेश टिळेकर हे 2014 मध्ये पुणे हडपसर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. सध्या ते विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT