सोलापूर

Solapur politics : एसआयआरवरून भाजपचा पलटवार

पत्रकार परिषद : काँग्रेसने ‘फेक नरेटिव्ह’ पसरवून जनतेची दिशाभूल केली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर सोलापूर भाजपने मंगळवारी (दि. २९) पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) ही पारदर्शक आणि नियमबद्ध प्रक्रिया असताना राहुल गांधी व विरोधकांकडून ‘फेक नरेटिव्ह’च्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपने केला.

ही पत्रकार परिषद भाजप कार्यालयात झाली. एसआयआर प्रक्रिया मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असून ती अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील निर्णय व प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण दिले आहे, असे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले. नवीन मतदारांची नोंदणी व माहिती तपासून यादी अद्ययावत केली जात असल्याचा दावा कोंड्याल यांनी केला. फॉर्म क्रमांक ६ द्वारे नवीन नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोहिणी तडवळकर यांनी राहुल गांधी आणि विरोधकांकडून एसआयआर संदर्भात गैरसमज निर्माण केला जात असल्याचा आरोप केला. या पत्रकार परिषदेला महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, सुधा अळ्ळीमोरे यांची उपस्थिती होती.

विरोधकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

दोन दिवसांच्या आंदोलनासाठीच विरोधक सोलापुरात येत असतात, असे सांगून भाजपचे नरेंद्र काळे यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. मुख्यमंत्री अकार्यक्षम असते तर जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले नसते, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधक खरोखरच सक्षम असते तर जनतेने त्यांचे केवळ दोन नगरसेवक निवडून दिले नसते, असा टोला त्यांनी लगावला.

गैरसमजाचा प्रयत्न

विकासाच्या मुद्द्यांवर विरोधकांचे लक्ष नाही, असा रोहिणी तडवळकर यांनी राज्यातील विकासकामांचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात रस्ते, पाणी, वीज आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वेगाने कामे सुरू आहेत. राज्याचा विकास होत असल्याचे विरोधकांना सहन होत नसल्याने जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT