Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur news : भाजपच्या 9 स्वीकृत सदस्य पदासाठी तब्बल 62 अर्ज

शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचाही अर्ज दाखल, अंतिम नावे गुप्त का... याचीही चर्चा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये राजकारण रंगताना दिसत आहे. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेपूर्वी स्वीकृत सदस्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत कमालीची गुप्तता पाळल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि. 18 फेब्रुवारी) भाजपातील तब्बल 62 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एमआयएमने एका जागेसाठी तीन जणांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवार कोण,हा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते 1.30 वाजेपर्यंत मुदत होती. एकूण दहा स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामध्ये सत्ताधारी भाजपचे 9 आणि एमआयएमचा एक निवडला जाणार आहे. दरम्यान, सभागृहात 20 फेब्रुवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होताच इच्छुकांमधील नाराजी उघड होण्याची शक्यता असून भाजप नेतृत्वाला अंतर्गत समन्वय राखण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

विशेष म्हणजे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनीही स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चेला आणखी उधाण आले आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि इच्छुकांनी मोठ्या अपेक्षेने अर्ज सादर केले असल्याने केवळ नऊ जागांसाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. भाजपने इतकी गोपनीयता का पाळली, सर्वांना एकाच वेळी अर्ज करण्याच्या सूचना का देण्यात आल्या आणि अंतिम नावे गुप्त का ठेवली, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार काही नावे आधीच निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

एमआयएममध्ये रस्सीखेच

एमआएममध्ये देखील एका जागेसाठी रस्सीखेच पहावयास मिळाली. फिरदोस पटेल, गाजी जहागिरदार आणि नय्युम सालार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. पक्षाने सालार यांना उमेदवारी दिली आहे. इतर दोन उमेदवारांचा पक्षाचा काही संबध नाही, असे एमआएमच्या गटनेत्या वाहिदा शेख यांनी प्रसार मध्यमाशी बोलताना सांगितले

पक्षाने 20 जणांची यादी प्रदेश पातळीवर पाठवली होती. अद्याप नावे फायनल नाहीत. त्यामुळे सर्व इच्छुकांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितले आहे. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नावे जाहीर केली जातील.
रोहणी तडवळकर , शहराध्यक्ष , भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT