सांगोला : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज क्र. 2 (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या मालवाहतूक टेम्पोला कार मागून धडकली, या झालेल्या विचित्र अपघातात कार चालकाची आई, मुलगी व नातवाचा मृत्यू झाला. तर चालकासह त्याची पत्नी, मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज क्र. 2 गावच्या हद्दीतील ओढ्यावरील पुलावर टायर फुटल्यामुळे रस्त्यालगत बुधवारपासून (दि. 25) टेम्पो (क्र. एमएच 13 सीयू 5163 उभा होता. या ट्रकला बुधवारी रात्री उशीरा चारचाकी वाहन क्रमांक एम एच 12 एसी ई 886 ही जाऊन जोरदार आदळली. यामुळे या चारचाकी वाहनातील आदिती अमर हातेकर (वय 25), जय अमर हातेकर (वय 2), सखूबाई ईश्वर गेजगे (वय 60, रा. सर्व सांगोला, सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची तर कारचालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय 50), स्वाती कबीरदास गेजगेे (वय 34), समृद्धी कबीरदास गेजगेे (वय 10 महिने, सर्व रा. पाटस, ता. दौड) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पाटस येथील कबीरदास गेजगे व त्यांचे कुटुंब हे त्यांचा नातू जय अमर हातेकरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगोला येथे गेले होते. वाढदिवस साजरा करून ते परतत होते. यावेळी हा अपघात झाला आहे. यामध्ये सांगोला येथील तिघेजण मरण पावले आहे.