- प्रा रेश्मा माने, युगंधर फाऊंडेशन, सोलापूर
पक्ष्यांचे निरीक्षण करणे, त्यांचा अधिवास समजून घेणे आणि त्यांच्या अस्तित्वापुढील आव्हानांचा विचार करणे ही काळाची गरज बनली आहे. दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबर हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून साजरा होतो. पक्ष्यांविषयी प्रेम, जिज्ञासा आणि संवर्धनाची जाणीव समाजात निर्माण व्हावी, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश असतो.
पक्ष्यांचे अस्तित्व म्हणजे निसर्गाच्या आरोग्याचा आरसा. आकाशात मुक्तपणे विहरणारे पक्षी केवळ निसर्गाचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वाचे कार्यही करतात.
पक्ष्यांचा विचार करताना महाराष्ट्राच्या निसर्गविश्वात दोन नावे विशेष आदराने घेतली जातात. पहिले नाव म्हणजे ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली आणि दुसरे म्हणजे निसर्गलेखक, पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली. डॉ. सलीम अली यांनी भारतातील पक्ष्यांचा शास्त्रीय अभ्यास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला तर मारुती चितमपल्ली यांनी जंगल, पक्षी, वन्यजीव आणि निसर्गातील सूक्ष्म निरीक्षणे आपल्या लेखनातून जिवंत केली. त्यांच्या साहित्यामुळे निसर्गाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी निर्माण झाली.
सोलापूरला समृद्ध पक्षीवैभव लाभले आहे. उजनी जलाशय, हिप्परगा तलाव, सिद्धेश्वर तलाव, नान्नजचे माळरान, माळढोक अभयारण्य परिसर, शेतशिवार हे पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास आहेत.
गवताळ प्रदेश नष्ट झाल्यास माळढोक, तितर, लावा यांसारख्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येतो. याशिवाय मोबाईल टॉवरमधील वाढ, विद्युत वाहिन्या, काचांच्या इमारती, कीटकनाशकांचा अतिवापर, प्लास्टिक प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेप हीदेखील पक्ष्यांच्या अस्तित्वापुढील गंभीर आव्हाने आहेत.
सोलापूरच्या पक्षीवैभवात माळढोक, मोर, तितर, लावा, माळटिटवी, चंडोल, पावशा, सुभग, खंड्या, वेडा राघू, बुलबुल, सूर्यपक्षी, शिंपी, साळुंकी, भारद्वाज, घार, घुबडसह फ्लेमिंगो, विविध बदके, रोहित, करकोचे, पाणकोंबड्या आणि इतर स्थलांतरित पक्ष्यांची उपस्थिती दिसून येते.