Solapur Bike Theft 
सोलापूर

Solapur Bike Theft : सराईत दुचाकी चोरटा गजाआड; नऊ मोटारसायकली जप्त

सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरसह गुलबर्ग्यातून चोरी; सोलापूर तालुका पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

गुळवंची : सोलापूर तालुका पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करत आंतरराज्यीय सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर आणि गुलबर्गा (कर्नाटक) परिसरातून चोरीस गेलेल्या नऊ मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

१ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, मुळेगाव तांडा परिसरात एक संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने आपले नाव सत्यवान रामहरी भोसले (वय ३४, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे सांगितले.

त्याच्याकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता ती मोहोळ येथून चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला संबंधित गुन्ह्यात अटक करून पोलिस कोठडी घेतली. कोठडीदरम्यान केलेल्या सखोल तपासात त्याने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपीकडून सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर आणि गुलबर्गा (कर्नाटक) येथून चोरीस गेलेल्या एकूण नऊ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, सहायक पोलिस उपनिरीक्षक विवेक सांजेकर, पोलिस हवालदार धनराज गायकवाड, राहुल महिंद्रकर, नागेश वाघमोडे, शशिकांत कोळेकर, पोलिस नाईक अनंत चमके, पोलिस अंमलदार पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर तसेच सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार निखिल पवार यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT