बार्शी : तालुक्यातील भोयरे येथे सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गांजा प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या नऊ, तर अटक आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे.
अमृत महादेव विधाते (वय 32, रा. चिंचोली, ता. आष्टी) व संतोष अनिल गायकवाड (34, रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड) अशी गांजा प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना आज बार्शी न्यायालयात उभे केले असता दोन तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आनंद विलास काळे (वय 39, रा. म्हसोबा गल्ली, कुर्डूवाडी, ता. माढा) व दयानंद महादेव आरकिले (वय 26, रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी) यांना रविवारपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी यापूर्वीच देण्यात आलेली आहे. अंकुश दशरथ बांगर (वय 37, रा. भोयरे), दिग्विजय उर्फ राज सुभाष घोळवे (वय 30,दोघे रा. बार्शी), बालाजी उत्तम कदम (वय 43), कृष्णा विठ्ठल दुरगुळे (वय 30, दोघे रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव), आनंद विलास काळे (वय 39, रा. म्हसोबा गल्ली, कुर्डूवाडी, ता. माढा) व दयानंद महादेव आरकिले (वय 26, रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
अरविंद डोळे हा अद्यापही फरार आहे. भोयरे शिवारात गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी उपसरपंच अंकुश बांगर याला अटक केली. कंटेनरमधून येथे गांडूळ खताची वाहतूक होत असल्याचा भास निर्माण करून गांडूळ खताच्या आतमध्ये गांजाच्या गोण्या भरून तो विक्री करण्याच्या उद्देशाने आणला होता. आयशरमध्ये गांजा भरताना पोलिसांनी एक कोटी 38 लाख 40 हजार रुपये किमतीचा गांजा व 25 लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त केली होती. तपास सपोनि दिलीप ढेरे करत आहेत. कामगिरी पो.उपनि. बालाजी वळसने, अभय उंदरे, सिद्धेश्वर लोंढे, गायकवाड, फत्तेपुरे, शेंडगे यांनी केली.