भोयरे येथे दगडफेक करून धुळवड साजरी करताना भाविकांचे दोन गट  Pudhari News Network
सोलापूर

सोलापूर : भोयरे येथे दगडफेक करून साजरी केली रक्ताची धुळवड

Holi 2025 |३०५ वर्षापासूनची प्रथा; प्रथा, रूढी परंपरा काळानुरूप बदलायला हव्यात, 'अंनिस'चे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : मोहोळ तालुक्यात सीना-भोगावती नदीच्या काठावर असलेल्या भोयरे गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या मंदिराच्या टेकडीवर काही भाविक उभे असतात. तर काही भाविक मंदिराच्या खाली उभे असतात. दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या भाविकांकडून एकमेंकांना तुफान दगड मारून दगड मारून धुळवड साजरी करतात. दगडफेकीची चालत आलेली ही परंपरा सुमारे ३०५ वर्षापासून आजही तितक्याच मोठ्या उत्साहात ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे. शुक्रवारी (दि.१४) धुळवडच्या सणादिवशी ही प्रथा मोठ्या उत्साहात पार पडली.

भोयरे येथे दगडफेक करून धुळवड साजरी करताना भाविकांचे दोन गट

भोयरे गावचे ग्रामदैवत श्री जगदंबा देवी असून हे मंदिर उंच टेकडीवर शेकडो वर्षांपूर्वी दगडात बांधण्यात आलेले आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी, बिटले (ता. मोहोळ) येथील देवी व भोयरे येथील जगदंबा देवी या सख्ख्या तीन बहिणी असल्याची अख्यायिका आहे. या देवीची यात्रा पौष्य महिन्यात भरते. परंतु धुळवडीदिवशी या ठिकाणी देवीच्या मंदिरावरून गावातील मुख्य चौक असलेल्या साखरबाई चौकात उभ्या असलेल्या भाविकांना तर चौकातील भाविक मंदिरावर उभ्या असलेल्या भाविकांना दगड मारून धुळवड साजरी करतात. हा दगड मारण्याचा प्रकार सुमारे अर्धा ते पाऊण तास चालतो. या दगडफेकीच्या कार्यक्रमापूर्वी गावातील सर्व जाती धर्मातील, सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते कोणताही मतभेद न मानता दुजाभाव, द्वेषाची भावना न ठेवता जगदंबा देवीचे भक्त म्हणून मंदिरात एकत्रित येऊन दर्शन घेतात.

मंदिरातून आई राजा उदे उदे...च्या गजरात वेशीत असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते. गावाजवळूनच गेलेल्या भोगावती नदीच्या पात्रात जाऊन हालग्या, झाजच्या कडकडाटात कुस्त्यांचा फड रंगतो. कुस्ती संपल्यानंतर देवीचा छबिना गावाची वेस असलेल्या हनुमान मंदिरापाठीमागे आल्यावर प्रथमतः त्या ठिकाणी उपस्थित भाविकांत दोन गट निर्माण होऊन एकमेकांवर तुफान दगडफेक केली जाते. काही वेळानंतर सर्वच भक्त मंदिराकडे येतात. त्यामधील काही भाविक मंदिरावर असलेल्या भक्तनिवासाच्यावर दगड घेऊन उभे असतात. तर काही भाविक मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य चौकात खालील बाजूस उभे राहतात. देवीचे पुजारी छबिना घेऊन मंदिरात जाताच क्षणी तुफान दगडफेक सुरू होते. दहा-पंधरा मिनिटे हा दगडफेकीचा थरार चालल्यानंतर त्यामध्ये काही भाविकांना दगड लागल्याने जखमी होऊन रक्तस्त्राव होतो. या दगडफेकीत लहान मुलापासून वयोवृद्ध भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले असतात. या दगडफेकीत भाविकांच्या हाताला, डोक्याला मार लागून भाविक जखमी झाले आहेत.

भोयरे येथे दगडफेक करून धुळवड साजरी करताना भाविकांचे दोन गट

हा दगडफेकीचा खेळ थांबल्यानंतर भाविक ग्रामस्थ श्री जगदंबा देवीच्या मंदिरात जातात. जखमी झालेल्या भाविकांना आई राजा उदे.. उदे.. चा जयघोष करीत देवीचा अंगारा लावला जातो. जखमी झालेले भाविक हे उपचारासाठी कुठल्याही दवाखान्यात न जाता सलग ७-८ दिवस चप्पल पायात न घालता जगदंबा देवीच्या मंदिरात जाऊन दररोज दर्शन घेतात.अंगारा लावला की, जखम आपोआपच व्यवस्थित होते, अशी अख्यायिका आहे. या दगडफेकीचा धुळवड पाहण्यासाठी तालुक्यातूनच नव्हे तर जिल्हाभरातून भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. हा धुळवडीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.

'वेदोक्त किंवा पुराणोक्त कोणतीही पूजा असू द्या, त्या पूजेमध्ये अनेक गोष्टी ह्या प्रतीकात्मक केल्या जातात. त्याप्रमाणे रुढी आणि परंपरा यामधील अनेक घटक हे प्रत्यक्ष न करता तेही प्रतीकात्मक केल्या जातात. जसे लग्नकार्यात पशुबळी देण्याची प्रथा होती. त्याऐवजी गव्हाच्या पिठाचा पशु बनवून त्याचा बळी दिला जातो. त्याप्रमाणे जर दगड फेकून मारण्याची प्रथा असेल तर दगड फेकून मारणाऱ्यामध्ये देव आणि दैत्य यांची भूमिका जर दोन्ही बाजूंनी ग्रामस्थच करत असतील, तर त्याप्रमाणे प्रतिकात्मक दोन्ही बाजूनी फक्त पाच-दहा दगड फेकावे. जेणेकरुन कोणास दगड लागून जखमा होणार नाहीत. याची काळजी देवस्थान कमिटीने यांनी घ्यावी, अशी विनंती अंनिसच्या वतीने करण्यात येत आहे.
सुधाकर काशीद, राज्य सरचिटणीस महा.अंनिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT