सोलापूर : उजनी आणि वीर धरणातून नीरा आणि भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे सोलापूरमधील कोल्हापूर पद्धतीचे २३ पैकी १५ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सीमावती भागातील कर्नाटकशी संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी भिमा नदीतील पाण्याची पातळी ही धोक्याच्या पातळी ओलांडून शेतातील पिकांत पाणी शिरले आहेत.
पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण १०० टक्के भरल्यातच जमा आहे. वीर धरणही शंभर टक्के भरल्याने गेल्या तीन दिवसांपूर्वी वीर धरणातून ६४ हजार क्युसेक तर उजनी धरणातून भीमा नदीत ९० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडले आहे. ते पाणी नीरा नृसिंहपूरपासून संगम झाल्यानंतर चंद्रभागेत रविवारी पहाटे दाखल झाले आहे. त्यामुळे चंद्रभागानेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे वीर धरणही पूर्ण भरल्याने नीरा नदीत विसर्ग सुरू असून. उजनी धरणाच्या खालील बाजूस महाराष्ट्राच्या हद्दीत भीमा नदीवर एकूण २३ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. यापैकी दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील सुमारे 15 बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असल्याने दोन्ही संपर्क ठप्प झाली आहे.
ही बंधारे पाण्याखाली
अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीवरील हिळ्ळी, खानापूर, आळगी-हिंगणी हे बंधारे तर सीना नदीवरील कलकर्जाळ ही बंधारे पाण्याखाली गेली आहेत. तर दुसरीकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीवरील बरुर-चणेगाव, औज, चिंचपूर, सादेपूर ही बंधारेही पाण्याखाली गेली आहेत.
पिके पाण्यात
रविवारी दुपारी १२ वाजता पंढरपूर येथे १ लाख ११ हजार ४१८ क्युसेक तर नीरा नरसिंहपूर येथे १ लाख २३ हजार ७४३ क्युसेक इतका भीमा नदीच्या पाण्याचा पात्रात विसर्ग होता. तो विसर्ग किमान एक दिवस राहणार असल्याने नदीकाठच्या उसासह अन्य पिकांत ही पाणी घुसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच ऊस पिकांची वाढ झालेली नाही. अशातच ऊस पाण्यात बुडाल्याने त्याचा ऊसाच्या शेंडीत पाणी शिरून वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.