सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत बीसीसीआयचे पाच सामने होणार आहेत. सी. के. नायडू ट्रॉफी, कूच बिहारी ट्रॉफी या स्पर्धांचे सामने होणार आहेत. याचे वेळापत्रकदेखील समोर आले आहे. त्यामुळे सोलापूरच्या क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण, दर्जेदार खेळपट्टी, ग्रीन आऊटफिल्ड तसेच सोलापूरची भौगोलिक परिस्थिती आणि तुलनेने कमी पावसाचे प्रमाण यामुळे सोलापूर क्रिकेट सामन्यांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत येथे झालेल्या सामन्यांच्या यशस्वी आयोजनामुळे सोलापूरच्या मैदानाची ओळख अधिक चांगली झाली आहे.
आगामी काळात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून अंडर-२३ गटातील विदर्भ, हैदराबाद आणि रेल्वे संघांचे सामने, तसेच अंडर-१९ कूच बिहार स्पर्धेतील दोन सामने सोलापूरला मिळाले आहेत. महाराष्ट्राचा प्रतिभावान आयपीएल खेळाडू राहुल त्रिपाठी आणि सोळंकी यांचे सरावासाठी सोलापूरमध्ये आगमन होणार असल्याने स्थानिक क्रिकेटपटूंनाही प्रेरणा मिळणार आहे.
या यशामागे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष दिलीप माने, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, संपूर्ण कार्यकारिणी तसेच मैदानाची देखभाल करणाऱ्या ग्राऊंड स्टाफचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
दरम्यान, इंदिरा गांधी स्टेडियमची उभारणी झाल्यानंतर १९७२ ते २०२२ या सुमारे ५० वर्षांच्या कालावधीत येथे १० ते १२ सामने झाले. २०२२ ते २०२६ या चार वर्षांत तब्बल १७ ते १८ सामने झाले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून सर्व सुविधा आणि बाबी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
वाढत्या सामन्यांमुळे सोलापूरच्या स्थानिक खेळाडूंना नामांकित क्रिकेटपटूंसोबत संवाद साधण्याची, त्यांच्याकडून टिप्स घेण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे येथील खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होत असून शहरात क्रिकेट संस्कृतीही वेगाने वाढत आहे. भविष्यात आणखी मोठे सामने आयोजित करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.- चंद्रकांत रेंबर्सू, सचिव, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन