Barshi News: बार्शीत कानठळ्या बसविणारे बुलेटचे सायलेन्सर केले चक्काचूर Pudhari
सोलापूर

Barshi News: बार्शीत कानठळ्या बसविणारे बुलेटचे सायलेन्सर केले चक्काचूर

बार्शी शहर वाहतूक पोलिसांनी १० गाड्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : ध्वनी प्रदूषणाचा कहर करणाऱ्या व नागरिकांना कानठळ्या बसविणाऱ्या २५ बुलेटच्या सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून चक्काचूर करण्यात आले. बार्शी शहर वाहतूक पोलिसांनी १० गाड्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.

शिवाजी महाविद्यालयासमोर भरधाव व कर्णकर्कश आवाज करीत बुलेट चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या एकूण २५ बुलेटवर कारवाई करत पोलिसांनी दंड वसूल केला आणि जप्त केलेल्या शहरात ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तरुणांमध्ये बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे आवाज काढण्याचे फॅड वाढले आहे. वेगवेगवेळ्या शब्दरचना करून दहशत पसरवणाऱ्या सायलेन्सरमुळे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि निवासी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी हा आवाज अधिक त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर शहरात विशेष मोहीम हाती घेण्यात आली. शिवाजी महाविद्यालय परिसरात नाकाबंदी करून पोलिसांनी दहा दुचाकी व २५ बुलेट ताब्यात घेतल्या. यातील १० गाड्या अल्पवयीन मुले चालवत असल्याचे आढळले. मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना वाहन दिल्याप्रकरणी त्यांच्या वडिलांवर प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. उर्वरित २५ बुलेटस्वारांवरही नियमबाह्य सायलेन्सर प्रकरणी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेले २५ सायलेन्सर शहर पोलीस ठाण्यासमोर आणून त्यावर रोडरोलर चालवून नष्ट केले. हे सायलेन्सर पुन्हा वापरात येऊ नयेत म्हणून ते थेट नष्ट करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

दरम्यान, मॉडिफाय सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजचालकांवरही आता थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. नागरिकांनी कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर टाळावा. नियमांचे पालन न केल्यास दंडासह वाहन जप्तीची कारवाई होईल, असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईचे शहरातील सुज्ञ पालक व नागरिकांकडून स्वागत होत आहे. भरधाव व कर्कश आवाजात गाडी चालवणाऱ्या तरुणांमध्ये मात्र धास्ती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT