सोलापूर

Solapur Crime : बार्शीत मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्यास अटक

सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : शहरातील कासारवाडी रोडवर महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा बार्शी शहर पोलिसांनी छडा लावला आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसरा फरार आहे. सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. महादेव शंकर पवार (वय 33, रा. महाळुंग, श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. विनोद गोविंद पिंपळे असे फरार आरोपीचे नाव आहे.

विकास हिंगमिरे (वय ४६, रा. बालाजी व्हीला, जुनी विडी घरकुल, सोलापूर) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची पत्नी कासारवाडी रोड परिसरातून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे २ लाख १० हजार ३९९ रुपये होती.बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.

महादेव पवार यास अटक करण्यात आली. दुसरा आरोपी विनोद पिंपळे हा फरार आहे. ही कामगिरी अभयकुमार माकणे, प्रवीण साठे, शबाना कोतवाल, धनराज फत्तेपूरे, प्रल्हाद अकुलवार, सचिन देशमुख, अंकुश जाधव, अजिज शेख, राहुल उदार, सचिन नितनाथ, अविनाश पवार, सतीश उघडे आणि सायबर पोलीस ठाण्याचे राहुल सोनकर यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT