सोलापूर

Solapur News : एकरी पंचवीस हजार खर्च करूनही पिके गेली

बार्शीत शेतकऱ्यांचा आक्रोश : केंद्रीय पथकाकडून दुष्काळी पाहणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर, बार्शी : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने शुक्रवारी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे व पानगाव येथे प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. या पथकांसमोर शेतकऱ्यांनी एकरी पंचवीस हजार रुपये खर्चून पेरणी केली; पण पावसाअभावी हातची पिके गेली, जगायचं कसं अशा भावना व्यक्त करून पाहणी पथकासमोर आक्रोश व्यक्त केला.

कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी हे या पथकाचे नेतृत्व करीत आहेत. तर पेयजल व स्वच्छता विभागाचे प्रमुख अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे पथकासोबत उपस्थित होते.

पावसाअभावी जळालेली सोयाबीन, तूर पिकांची स्थिती यांची पाहणी करून पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पथकाने पानगाव येथील कोरडा पडलेल्या साठवण तलावाचीही पाहणी केली. उपळाई ठोंगे येथे लता शेळवणे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यांचे बंधू कल्याण चव्हाण यांनी पथकाला पीक नुकसानीची माहिती दिली. चार एकर क्षेत्रात पीक घेण्यासाठी प्रतिएकर २० ते २५ हजार रुपये खर्च झाला असून, पीक नष्ट झाल्याने उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केंद्रीय पथकाला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीची व्याप्ती आणि पाणीटंचाईबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात सध्या १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पीक नुकसानीचे आतापर्यंत ६० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, पुढील दोन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करू, असे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, तहसीलदार एफ. आर. शेख, मृद व जलसंधारण विभागाचे रामचंद्र क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी संतोष कोल्हे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT