बार्शी: सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा तांदूळ अवैधरित्या विक्रीसाठी नेत असताना बार्शी तालुका पोलिसांनी एका पिकअपसह ८० पोती तांदूळ जप्त केला. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक ज्ञानेश गजाराम कुंटलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालकासह दोन आडत दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिकअप चालक अक्षय राजाभाऊ बारसकर( रा. दत्तनगर, वैराग ता. बार्शी), व आडत दुकानदार दिगंबर सुरवसे, विवेक सुरवसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, अमृत खेडकर व लक्ष्मण चित्तलवाड यांनी ही कारवाई केली. सौंदरे येथे सापळा रचून सदर पिकअप पकडण्यात आला.
ताडपत्री बांधलेल्या पिकअपमध्ये काळे, पांढरे व हिरव्या रंगाची ८० प्लास्टिक पोती आढळली. वजन काट्याच्या पावतीनुसार त्यात एकूण ४६१० किलो तांदूळ होता. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत १ लाख ९८ हजार २३० रुपये आहे. पिकअपची किंमत ७ लाख रुपये असून एकूण ८ लाख ९८ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत चालकाने हा तांदूळ बार्शीतील तुळजापूर रोडवरील मार्केट यार्डमधील दिगंबर संभाजी सुरवसे व विवेक संभाजी सुरवसे यांच्या आडत दुकानातून भरल्याचे सांगितले.