सोलापूर ः शहरापासून जवळच असलेल्या बाळे भागातील तोडकर वस्तीजवळ पाच फूट लांबीचा कोब्रा नाग आढळला. त्याच्या डोक्यावर आणि मानेभोवती पांढऱ्या रंगाचे ठिपकेही आहेत. हा विषारी कोब्रा सामान्य नसून दुर्मीळ ल्युसिस्टिक प्रकारचा आहे.
तोडकर वस्ती येथे सुरेश क्षीरसागर यांना त्यांच्या वस्तीच्या संरक्षक भिंतीजवळ कोब्रा दिसला. त्यांनी वन विभागास याची माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी हा कोब्रा पकडला. या सापाची वैद्यकीय तपासणी ‘ॲनिमल राहत’चे डॉ. आकाश जाधव यांच्याकडून करण्यात आली. डॉ. जाधव कोब्रा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर वन परिक्षेत्र कार्यालयाकडे या कोब्राविषयी नोंद करण्यात आली. त्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
या बचाव कार्यात सोलापूर वनविभाग उपवनसंरक्षक कुलराज सिंग, सहायक वनसंरक्षक अजित शिंदे, सहायक वनसंरक्षक ऐश्वर्या शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे, वन परिक्षेत्र अधिकारी शीला बडे, वनपाल रुकेश कांबळे, वनरक्षक गंगाधर विभूते, रेस्क्यू टीम प्रवीण जेऊरे, मुन्ना निरवने, प्रसाद बोलदे, शिवानंद हिरेमठ, राहुल दोरकर यांच्या पथकाने सहभाग नोंदविला.