Auto rickshaw fare hike pudhari photo
सोलापूर

Auto Rickshaw Fare : रिक्षाला आता पहिल्या दीड कि.मी.साठी ३० रुपये

९ ऑक्टोबरपासून नवी दरवाढ लागू; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील रिक्षा चालकांच्या मनमानी भाडेवाढीला आता चाप बसणार आहे. चार वर्षांनंतर रिक्षा भाड्यात वाढ झाली आहे. आता रिक्षासाठी पहिल्या दीड किलोमीटरला २३ ऐवजी ३० रुपये तर त्यापुढील प्रतिकिमीसाठी १५ ऐवजी २० रुपये भाडे द्यावे लागणार आहे.

येत्या ९ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले. रिक्षाचालक व प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात ६१ नव्या रिक्षा थांब्यांना मंजुरी दिली. त्यामुळे शहरातील विविध भागांत रिक्षा थांब्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. रिक्षा चालकांकडून होणारी गैरवर्तणूक, जादा भाडे आकारणी किंवा अन्य समस्यांबाबत प्रवाशांना तक्रार करता यावी, यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा सेवा अधिक शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

ई-रिक्षांना महामार्गावर बंदी

शहरात सध्या १५३ ई-रिक्षा आहेत. या ई-रिक्षांची कमाल गती ताशी सुमारे २५ किलोमीटर असल्याने राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ई-रिक्षाचालकांना निर्धारित मार्ग व शहरातील रस्त्यांवरच वाहतूक करावी लागणार आहे.

डिजिटल मीटरसह क्यूआर कोड बंधनकारक

रिक्षा प्रवास अधिक पारदर्शक करण्यासाठी डिजिटल मीटरचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना रोख रकमेऐवजी डिजिटल पद्धतीने भाडे अदा करता यावे, यासाठी प्रत्येक रिक्षामध्ये क्यूआर कोड लावणे आवश्यक करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT