सोलापूर : यंदा आषाढी वारीच्या नियोजनासाठी सुमारे 85 कोटी रुपये खर्च झाला असून, वारीसाठीच्या प्रत्येक नियोजनाची डॉक्युमेंटरी तयार करणार आहे. त्यामुळे पुढील काळात अधिकारी, कर्मचार्यांना वारीचे नियोजन करताना ती उपयोगी पडेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
पाऊसमान चांगले झाल्याने वारीत सुमारे 28 लाख वारकरी सहभागी झाले होते. एआय तंत्रज्ञानाच्या वापर करून वारकर्यांची संख्या मोजण्यात आली. मंदिर परिसर नो व्हेईकल झोन करण्यात आला. व्हीआयपी दर्शन बंद केल्याने भाविकांना त्रास न होता विठ्ठलाचे दर्शन घडल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. वारीसाठी ग्रामविकास विभागाकडून 45 लाख, जिल्हा नियोजन समितीमधून 12 लाख, नगरविकास विभागाकडून 28 कोटी असा एकूण सुमारे 85 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.
येत्या काळात ग्लोबल वार्मिंगमुळे पाऊसमानातील बदलांमुळे आषाढी वारीवर पुराचा धोका राहणार आहे. उजनी धरणात पाणी साठवणूक करण्याची क्षमता आहे. परंतु निरा नदीवर असलेल्या वीर धरणात पाणी साठवणूक क्षमता कमी आहे. त्यामुळे आषाढी वारीत पाऊस पडल्यास त्याचा फटका वारकर्यांना बसतो. त्यामुळे वीर धरणावर आणखी एक बंधारा किंवा धरण बांधल्यास पाणी अडवून पूर व्यवस्थापन करणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
आषाढी वारीत लाखो वारकर्यांची गर्दी असल्याने यंदा जिल्हा प्रशासनाने फोर जीच्या हायटेक जमान्यात टू जी मोबाईलचा वापर करत अधिकारी - कर्मचार्यातील संवाद वाढविला. त्यासाठी एक हजार रुपये किमतीचे इंटरनेट सुविधा नसलेले 140 मोबाईल खरेदी करण्यात आले. वॉकीटॉकीसह या टू जी मोबाईल उपयुक्त ठरले. विशेष या मोबाईलला इंटरनेट नसल्याने आणि मोबाईल अधिक वेळ चॉर्ज राहत असल्याने त्याचा फायदा झाल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.