सोलापूर : अल्पवयीन मुलीचा विवाह होऊन ती गर्भवती झाल्याची माहिती बालकल्याण विभागाला दिल्याने गुन्हा दाखल झालेल्या अनेक कुटुंबांकडून आशावर्कर्सना धमक्या देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. अशाच एका आशावर्करला धमकी दिल्याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वरी उमेश स्वामी (रा. विडी घरकुल, सोलापूर) या आशावर्करने फिर्याद दिली आहे. मुळेगाव रोडवरील मोमीन नगर येथे राहणारे पिंटू पवार व त्यांच्या पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रामेश्वरी या माहिती घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्यांच्या सूनेची नोंदणी करताना तिचा शाळा सोडल्याचा दाखला त्यांनी मागितला. तो दाखल पाहिल्यानंतर ती मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. रामेश्वरी यांनी ही माहिती निकीता सिस्टर यांना दिली. त्यानंतर निकीता सिस्टर यांनी ही माहिती महिला व बालकल्याण विभागाला दिली. त्यानंतर पिंटू पवार आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर माहिती रामेश्वरी यांनी दिली असल्याने रागाने पिंटू पवार यांनी रामेश्वरी यांना मोबाईलवर फोन करुन शिवीगाळ केली. तुम्ही माहिती दिल्याने आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे असे सांगत अर्वाच्च भाषेत पुन्हा शिवीगाळ करुन दमदाटी केली. दरम्यान रामेश्वरी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पिंटू पवार व त्यांच्या पत्नीवर शिवीगाळ, धमकी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.