सोलापूर : एकीकडे शहर स्मार्ट असताना दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवण्यातच प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. आसरा चौकातील एका इमारतीत दूषित पाण्यामुळे अतिसाराचे ४० रूग्ण आढळले आहेत.
याच दुषित पाण्याने २०१० साली २१ जणांचा बळी घेतला होता. पाणी, रस्ते व वीज या मुलभूत गरजा पुरवण्यात महापालिका कमी पडत आहे. ओव्हर फ्लो झालेल्या ड्रेनेजमुळे आसरा चौक परिसरातील एस. बी. प्लाझा मधील ४० जणांना अतिसाराची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले. या एस. बी. प्लाझा इमारतीत ३५ कुटुंबे राहतात. यातील ४० जणांना अतिसारामुळे शहराच्या विविध रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हे विसरता कामा नये...
२०१० साली व्हीवको प्रोसेस जवळील क्रांतीनगर झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याने पहिला बळी गेला होता. त्यानंतर जगजीवनराम झोपडपट्टी, कोयना नगर आणि भगवान नगरमध्येही रुग्ण आढळले होते. तब्बल २१ जणांचा मृत्यू या दूषित पाण्याने झालेला होता. तत्कालीन आयुक्त रणजीत देवोल यांच्या हाताबाहेर स्थिती होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने नियुक्ती केली होती.
मुंबईहून तज्ज्ञ मंडळी बोलवली गेली होती. तब्बल दहा दिवसांच्या परिश्रमानंतर नेमका दूषित पाणीपुरवठा कुठून होत आहे? मैलामिश्रित पाणी जलवाहिनीमध्ये कोणत्या ठिकाणाहून मिसळत आहे? याचा विशेष यंत्राद्वारे तपास करून हा प्रश्न मार्गी लावला होता. परंतु ही सर्व यंत्रणा काम संपूर्ण करेपर्यंत सोलापूर शहरात २१ निरपराध लोकांचा मृत्यू याच दूषित पाण्याने झाला होता हे विसरता कामा नये.
या परिसरामध्ये असणारी ड्रेनेज लाईन जुन्या असून ती बदलून द्यावी, अशी मागणी आम्ही महानगरपालिकेकडे केली आहे. तसेच विभागीय कार्यालयांमध्येही अनेकदा तोंडी आणि लेखी तक्रारी दिल्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.- मझहर हुंडेकरी, नगरसेवक