Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur News: स्वीकृत नगरसेवकपदासाठी आज होणार अर्ज दाखल

भाजपमध्ये इच्छुकांच्या लॉबिंगला वेग

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी बुधवारी (दि. 18) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार असून इच्छुकांमध्ये मोठी चुरस आहे. सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत आयुक्त कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यावेळी महापालिका आयुक्त स्वतः उपस्थित राहून प्रक्रिया पार पाडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

यंदा दहा स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार असून त्यापैकी एक सदस्य एमआयएमकडून, तर उर्वरित सदस्य सत्ताधारी भाजपकडून निवडले जाणार आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत लॉबिंगला वेग आला आहे. विविध सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक गटांकडून आपल्या नावासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत पक्षाकडून कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. महापौर, सभागृह नेते किंवा इतर वरिष्ठ पदाधिकारी यापैकी कोणीही अधिकृत भूमिका मांडण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर सध्या 30 ते 40 इच्छुकांची नावे व्हायरल होत असली तरी त्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. काही नावे मुद्दाम पुढे आणली जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम यादी अर्ज प्रक्रियेनंतरच निश्चित होणार असून उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीमुळे महानगरपालिकेतील सत्ता समिकरणांवर परिणाम होणार असल्याने राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.

चर्चेला उधाण

स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कार्यालयात आज मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मोजक्याच लोकांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून नगरसचिव आतापर्यंत अर्ज स्वीकारत होते. मात्र यंदा आयुक्तांनी ही प्रक्रिया आपल्या ताब्यात घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सर्वसाधारण सभा

महापौर विनायक कोंड्याल यांनी दि. 20 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा बोलावली आहे. या सभेमध्ये स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती सदस्य आणि इतर सदस्यांची नियुक्ती केल्या जाणार आहेत. ही सर्व नावे सभागृह नेते महापौरांकडे सुपूर्त केल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा महापौर करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT