सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या खंद्या समर्थकांचा झालेला पराभव नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.
अनुसूचित जाती-जमातीमधून बोरामणीचे रवी रोकडे यांचा पराभव झाला. यापूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांची पत्नी स्वाती या भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा पराभव काँग्रेसच्या उमेदवार मुस्तीस्थित रेखा गायकवाड यांच्याकडून झाला. म्हणून, नेतृत्वाशी एकनिष्ठ असलेल्या रोकडे यांना आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पॅनेलमधून आपल्याच कोट्यातून संधी दिली होती. मात्र, यात त्यांचा दणकून पराभव झाला. रोकडेच्या पत्नीचा जिल्हा परिषद निवडणुकीत व रोकडेचा आता बाजार समिती निवडणुकीत झालेला पराभव आ. कल्याणशेट्टींच्या जिव्हारी लागला आहे.
आर्थिक दुर्बल घटकमधून भाजपचे निष्ठावान व आ. सुभाष देशमुख यांचे समर्थक असलेले यतीन शहा यांचा पराभव हा अल्पसंख्याक व जातीच्या समीकरणातून झाला. नेतृत्व व पक्षनिष्ठा याचे अतिशय उत्तम उदाहरण असलेले शहा गेल्या अनेक वर्षांपासून आ. देशमुख यांच्यासह भाजपशी प्रामाणिक होते. तरीही त्यांचा झालेला पराभव त्यांच्यापेक्षा आ. देशमुखांच्याच जास्त जिव्हारी लागला आहे. त्यातच त्यांच्या गटाचे नेते आणि माजी उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनाही शहा यांच्या पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे स्वतः चिवडशेट्टी निवडून येऊनही त्यांनी आजपर्यंत एकही सत्कार स्वीकारला नाही. यातच सर्वकाही आले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांचा बाजार समितीच्या आखाड्यातील पराभव हा माजी आमदार दिलीप माने यांच्या मनावर आघात करणारा ठरला. कारण वानकर हे माने यांच्या कोट्यातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते.
लवंगीचे विद्यमान सरपंच संगमेश बगले-पाटील हे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांचे खंदे समर्थक होत. त्यामुळे हसापुरेंनी सरपंच बगले यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देत त्यांची निवड प्रतिष्ठेची केली होती. छोट्या गावचे सरपंच बगले-पाटील यांनी आमदार पुत्र मनीष देशमुख यांच्याशी दोन हात केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्याचा हा पराभव हसापुरेंना धक्का मानला जात आहे.
आर्थिक दुर्लब घटक मतदार संघातील आ. सुभाष देशमुख यांचे खंदे समर्थक उमेदवार यतीन शहा यांना जोरदार धक्का बसला.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील उमेदवार व माजी आ. दिलीप माने यांच्या कोट्यातील उमेदवार गणेश वानकर यांचा दारुण पराभव मानेंच्या जिव्हारी लागला.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील उमेदवार व सुरेश हसापुरे यांचे समर्थक संगमेश बगले यांचा दारुण पराभव हसापुरेंनांच दणका मानला जात आहे.
श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांचे एकनिष्ठ बोरामणीतील रवी रोकडे यांचा ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातील पराभव हा खुद्द आ. कल्याणशेट्टीनाच धक्का मानला जात आहे.
ग्रामपंचायत गटातील तीन निकाल भाजपच्या बाजूने गेले. सुनील कळके यांच्या माध्यमातून सत्ताधारी महाआघाडीच्या पदरात एकमेव दान पडले.