सोलापूर : नदी व कालव्यालगतच्या गावांना एक दिवसाआड सलग सहा तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे नियोजन करावे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे व अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकाच वेळी आणि समप्रमाणात वीजपुरवठा उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा खंडित करण्याबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या पिकांचा विचार करून योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. पाण्याची नासाडी टाळल्यास किमान १० ते १५ टक्के पाणी बचत करणे शक्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे आणि पिके उभी आहेत, त्यांना आवश्यक पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
यावेळी आ. सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सुभवेंद्र खांडेकर, धीरज साळी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार, कंदले, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. खा. धैर्यशील मोहिते -पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी, पुणे जिल्हाधिकारी, अहिल्यानगर जिल्हाधिकारी तसेच जलसंपदाचे पुणे येथील वरिष्ठ अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते.
मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा असा
एकरुख प्रकल्पातील ०.४५ टीएमसी पाणी सोलापूर व १४ ग्रामपंचायतींसाठी हे पाणी
३० जून २०२७ पर्यंत पुरणार आहे.
हिंगणी (पा) प्रकल्पातील ०.४४ टीएमसी पाण्यावर वैराग व ९ ग्रामपंचायतीसाठीचे पाणी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल.
जवळगाव प्रकल्पातील ०.३६ टीएमसी पाण्यावर ९ ग्रामपंचायतींसाठीचे पाणी
३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरणार आहे.
मांगी प्रकल्पातील ०.०९ टीएमसी पाण्यावर १३ ग्रामपंचायतींसाठीचे पाणी ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पुरेल.