Ganja Pudhari
सोलापूर

Solapur Crime : आळगीत १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त; उसाच्या शेतात होती २४० झाडे

दक्षिण पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने मौजे आळगी (ता. अक्कलकोट) येथे उसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त करून मोठी कारवाई केली

पुढारी वृत्तसेवा

अक्कलकोट : दक्षिण पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने मौजे आळगी (ता. अक्कलकोट) येथे उसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त करून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २११ किलो १०० ग्रॅम वजनाची २४० गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असून, एकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकने यांनी दिली.

मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते. २८ सप्टेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व पथक करजगी दुरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करीत असताना आळगी येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक घुगे यांच्या पथकाने शेतात कारवाई केली. ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी सुमारे १२ फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली.

पंचनाम्यांतर्गत केलेल्या कारवाईत एकूण २४० झाडे मिळून आली. त्यापैकी २१० झाडे जिवंत तर ३० झाडे वाळलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या झाडांचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम भरले. या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) यांच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT