अक्कलकोट तालुका : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वामींच्या भेटीला आलेल्या पालख्यातील भक्तगण.  
सोलापूर

Akkalkot News : त्रिपुरारी पौर्णिमेला स्वामी भक्तांची मांदियाळी

ठिकठिकाणच्या २० पायी पालख्या स्वामी समर्थांच्या भेटीला

पुढारी वृत्तसेवा

अक्कलकोट तालुका : श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये झाली. लाखो भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. २० पायी पालख्यांचे आगमन झाले. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नामाच्या गजराने अक्कलकोट नगरी दुमदुमून गेली.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट शहरांमध्ये लाखोच्या संख्येने स्वामीभक्त श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता उपस्थित राहतील याकरिता श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने भक्तांचे दर्शन सुलभ होण्याकरिता योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. श्री स्वामी समर्थ महाराजांची पहाटेची काकड आरती चार वाजता झाली. पौर्णिमा व वाढती गर्दी लक्षात घेता भक्तांचे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. आरती झाल्यानंतर भक्तांना गाभारा दर्शन खुले करण्यात आले. चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बॅरिकेट लावून मंदिराच्या बाहेरदेखील दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. पहाटेच्या काकड आरतीपासून पोलिसाची तत्पर सेवादेखील या ठिकाणी पहावयास मिळाली.

श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथेही भक्तांनी मोठी गर्दी केली होती.पहाटे चार वाजता काकड आरती झाली. समाधीचे अभिषेक करून भक्तांना स्वामींचे दर्शन खुले करण्यात आले. पुजारी परिवाराच्या वतीने सकाळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री राजेराय मठातही भक्तांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. पहाटे सहा वाजता येथील पादुकांचे अभिषेक करून मंदिर दर्शनास खुले करण्यात आले होते. गुरू मंदिरातही भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT