सोलापूर

सोलापूर विमानसेवेचा लवकरच श्रीगणेशा

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  सोलापूरच्या विकासाच्यादृष्टीने होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी उच्च स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर विमानसेवेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येते. स्टार एअर, फ्लाय बिग व इंडिगो यासारख्या कंपन्यांनी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.

केंद्र शासनाच्या 'उडाण' योजनेंतर्गत 2017 मध्ये सोलापूरचा समावेश करण्यात आला होता. परंतु येथून विमानसेवा सुरू करण्यास 106 प्रकारचे लहान-मोठे अडथळे होते. यात प्रमुख्याने श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी हा मोठा अडथळा असल्याने विमानसेवा सुरू करता आली नाही. अखेर अनधिकृत चिमणी पाडून मनपा प्रशासनाने मोठा अडथळा दूर केला. अद्याप 105 प्रकारचे अडथळे असल्याचे समजते. हे अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे सोलापूर विकास मंचच्या वतीने एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया यांची भेट घेऊन डीजीसीए, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी व नागरी उड्डाण मंत्रालय यांच्याशी सोलापूर विमानसेवा तातडीने सुरू करावी यासाठी पत्रव्यवहार केला आहे. डीजीसीएची टीम सोलापूर विमानतळावरील सुरक्षा, नागरी सुविधा, येथील विमानतळाची धावपट्टी यासह येथील अन्य व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी लवकरच सोलापुरात येणार आहे.

पर्यटनाला मिळणार चालना

सोलापूर शहर-जिल्ह्यालगत अनेक धार्मिक स्थळे आहेत. याठिकाणी देशभरातून भक्तगण पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. दुसरीकडे सोलापूरहून मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, सुरत, चेन्नई, तिरूपती याठिकाणी व्यापार-व्यवसायासाठी जाणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. विमानसेवा सुरू झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळून व्यवसाय वृध्दी होण्यास मदत होईल. सोलापूर जिल्हा धार्मिक स्थळ घोषित करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगितले.

स्थानिकांना रोजगाराची संधी

सोलापुरातील बहुतांश युवक उच्चशिक्षित असतानादेखील याठिकाणी उद्योग-व्यवसाय नसल्यामुळे मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई याठिकाणी कामासाठी स्थायिक झाले आहते. सोलापुरात लवकरच आयटी कंपनी, त्याचबरोबर टाटा शोरूम स्थापन होणार असल्याचे समजते. यामुळे येथील स्थानिक युवकांना कामासाठी इतर शहरांत जाण्याची गरज भासणार नाही. याप्रकारे भविष्यात आणखी काही कंपन्यांनी सोलापुरात आपला विस्तार केल्यास सोलापूरचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT