सोलापूर : बहुप्रतीक्षेत असणारी सोलापूर-मुंबई हवाईसेवा ही येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, यात सोलापूर-बंगळूर ही हवाईसेवा मात्र वगळण्यात आली आहे. दरम्यान, सोलापूर-मुंबई विमानसेवा मात्र लवकरच सुरू होणार आहे. याबाबत अंतिम निर्णय होऊन तिकीट बुकिंगही सुरू होणार आहे.
सोलापूरकरांसाठी हवाई सेवा महत्त्वाची बनत आहे. सोलापूर विमानतळावरून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूर या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अशी घोषणा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली होती. यासाठी 20 सप्टेंबरपासून तिकीट बुकिंग होणे अपेक्षित होते. परंतु, घोषणा होऊन 5 दिवस झाले तरी अद्याप तिकीट बुकिंग सुरू झालेले नाही.
या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळूरशी थेट व जलद हवाई संपर्क होती. त्यातून व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे सोय होणार होती. परंतु स्टार एअर लाइन आणि शासनातील काही तांत्रिक अडचणींमुळे आता बंगळूर विमानसेवा रद्द झाली आहे. पहिल्या टप्यात सोलापूर-मुंबई हवाई सेवा सुरू होणार आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर-मुंबई विमानसेवेला निश्चिती मिळाली आहे. तिकीट दर आज 26 सप्टेंबर रोजी अंतिम होऊन तिकीट बुकिंग सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.
मुंबई-सोलापूर : प्रस्थान दु. 2.45 वा.
सोलापूर-मुंबई : प्रस्थान दु. 12.55 वा.
नियोजित शेड्युलप्रमाणे येत्या 15 ऑक्टोबर रोजी सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार असून, आज संध्याकाळपर्यंत तिकीट बुकिंग सुरू होईल. पहिले विमान मुंबई येथून सोलापूरला येईल.- अंजनी शर्मा, व्यवस्थापक, होटगी रोड विमानतळ