सोलापूर : सोलापूरकरांच्या हवाई प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. होटगी रोड विमानतळासाठी येणाऱ्या खर्चाच्या केवळ ५० टक्के खर्चातच बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू होऊ शकते. होटगी रोड विमानतळाचे अद्ययावतीकरण करून तेथे 'नाईट लँडिंग' सुविधा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे, बोरामणी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून माळढोक पक्षी आढळलेला नसल्याने तेथेही विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होत आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सोलापूर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी प्रशासन आणि शासन स्तरावर वेगाने हालचाली सुरू आहेत. केंद्र शासनाच्या 'उडान' योजनेत सोलापूर शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे होटगी रोड येथील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी लवकरच नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
होटगी रोड विमानतळावर रात्रीच्या वेळी विमाने उतरण्यासाठी (नाईट लँडिंग) आवश्यक त्या सुधारणा व अद्ययावतीकरण केले जात आहे. मात्र, या विमानतळाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पर्याय अधिक किफायतशीर ठरू शकतो. बोरामणी भागात अनेक वर्षांपासून माळढोक पक्षाचे वास्तव्य आढळून आलेले नाही. त्यामुळे तेथील तांत्रिक अडचणी दूर करून होटगी रोडच्या निम्म्या खर्चात बोरामणीतून आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही गोरे यांनी सांगितले.
'उडान'मुळे नव्याने निविदा निघणार
सोलापूरचा 'उडान' योजनेत समावेश झाल्याने होटगी रोड विमानतळावरून लवकरच नव्या निविदा निघणार आहेत. या विमानतळावरून अद्ययावतीकरण करून रात्रीची विमानसेवा सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी काम सुरु असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.