आमसिद्ध व्हनकोरे
सोलापूर : सोलापूर शहरातील हवेची गुणवत्ता पार खालावली गेली आहे. यामुळे शहरवासीयांचा श्वास गुदमरू लागला आहे. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १०१ ते १५३ दरम्यान नोंदवला गेला. या पातळीवर हवेतील प्रदूषण सामान्य मर्यादेपेक्षा खूप जास्त असते. अशी हवा मानवी आरोग्यासाठी धोकादायक असते.
दरम्यान, दोन दिवसांपासून दिवाळीचे फटाके फोडण्यानेही वातावरणातील प्रदुषणासह आवाजाची मर्यादाही ओलांडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. शहरातील प्रमुख प्रदूषक असलेल्या PM2.5 चे प्रमाण ३५ ते ५९ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर, तर PM10 चे प्रमाण ४१ ते २२९ मायक्रोग्रॅमपर्यंत नोंदवले गेले. हे प्रमाण आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. शहरातील बांधकाम, वाढती वाहनसंख्या व वाहतूक कोंडी यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच कोरडे हवामान व मंद वाऱ्यामुळे प्रदूषक कण हवेतच साचून राहत आहेत. पावसाळ्यात पावसामुळे धूलिकण खाली बसून हवा स्वच्छ होते.
या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा, ॲलर्जी असलेल्या रुग्णांना आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रदूषित भागात मास्क वापरणे आणि धुळीच्या वातावरणात व्यायाम टाळणे आवश्यक आहे.
सोलापूरकरांच्या आरोग्याला धोका
सामान्य नागरिक : जास्त वेळ या हवेत राहिल्यास खोकला, छातीत जडपणा, डोळे जळजळणे, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
संवेदनशील गट (अतिधोका) : लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला, आणि विशेषतः ज्यांना अस्थमा (दमा), ब्रॉन्कायटिस किंवा हृदयाचे आजार आहेत, अशा लोकांना गंभीर त्रास होऊ शकतो आणि त्यांचे आजार बळावू शकतात
अशी घ्या काळजी
मास्कचा वापर करा : घराबाहेर पडताना सामान्य कापडी मास्कऐवजी N95 किंवा KN95 मास्क वापरा, जे हवेतील सूक्ष्म कण (PM2.5) रोखण्यास सक्षम असतात
मैदानी व्यायाम टाळा : सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर धावणे, जड व्यायाम करणे किंवा फिरणे काही दिवस टाळा. व्यायाम करायचा असल्यास तो घरातच करा
खिडक्या बंद ठेवा : घरात बाहेरील दूषित हवा येऊ नये म्हणून खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. शक्य असल्यास एअर प्युरिफायरचा वापर करा
भरपूर पाणी प्या : शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी आणि घशाची जळजळ कमी करण्यासाठी भरपूर पाणी, कोमट पाणी किंवा द्रवपदार्थ प्या
दिवाळीत प्रदूषण वाढते, हे खरे आहे. पण अलीकडे त्याचे प्रमाण जास्त झाले आहे. ध्वनीप्रदूषणही वाढले आहे. आता त्यावर कारवाई होणे अवघड आहे. मुळात हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न हवेतच, शिवाय कारखाने जे उत्पादन करतात, तेथेही नियंत्रण करणे गरजेचे आहे.योगीनाथ कुडते, पर्यावरण अभ्यासक, सोलापूर