सोलापूर

Solapur news: दोन दिवसांत एक लाख 15 हजारांची उलाढाल

कृषी धान्य महोत्सव : जांभूळ कुल्फी, हुरडा, ज्वारी बिस्किटे खरेदीकडे कल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : कृषी महोत्सवात गुळाचा चहा, ज्वारीची बिस्किटे, जांभूळ कुल्फी, हुरड्यासह इतर सेंद्रीय पदार्थ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे चित्र असून, दोन दिवसात एक लाख 15 हजार रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे.

कृषी विभागातर्फे हुतात्मा स्मृती मंदिरात सोमवार, दि.23 ते बुधवार, दि. 25 पर्यंत कृषी धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचा आज बुधवारी (दि.25) समारोप होणार आहे.

महोत्सवात कृषी विभागाने 46 स्टॉल लावले आहेत. त्यात मंद्रूपच्या मळसिद्ध कोकळगी यांच्या हुरड्याच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी सुमारे दोन क्विंटल हुरड्याची विक्री झाली. 200 ते 250 रुपये किलोने हुरड्याची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे हुरड्याला चांगला पसंती मिळत आहे.

हुरड्यासह या महोत्सवात सेंद्रिय गुळ, काकवी, गुळाचा चहा, मंगळवेढ्याची प्रसिद्ध ज्वारी, हुरडा, जांभूळ कुल्फी, ज्वारीचे बिस्किटे, केळी, शेवगा पावडर, मध, वाळवण पदार्थ, वाळवलेला भाजीपाला, मल्टीमिलेट आटा, ज्वारी व बाजरीची कडक भाकरी, शेंगाची चटणी, खारोटे हे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ज्वारी संशोधनाची माहिती घेण्याकडे कल

बार्शीचा शाळू, काळी कुसळी सोना मोती गहू, घाण्यावरील करडई तेल, हळद, शेवया खीर, कच्च्या केळांची पावडर, गुलकंद आवळा, कोरफड, मोरावळ, सैंधव मीठ आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या महोत्सवात शेतकऱ्यांना लागणारे आधुनिक टोकन यंत्रही मांडण्यात आली आहेत. तसेच ज्वारी संशोधन केंद्राचा स्टॉल व माती परीक्षण केंद्राबाबतही शेतकरी माहिती जाणून घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT