सोलापूर : इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा ९७ आश्रमशाळा आहेत. या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना चालू शैक्षणिक सत्रासाठी संच मान्यता दिली असून यासाठीची प्रक्रिया पारदर्शक व समुपदेशनाने पूर्ण करण्यात आली आहे. ही संच मान्यता मागील वर्षीच्या २० ऑक्टोबरच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारीत आहे.
सहाय्यक संचालक कार्यालयाकडून तालुकानिहाय मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. मागील वर्षीच्या २० ऑक्टोबर रोजी सरल प्रणाली आणि युडायस वरील वैध विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून संच मान्यता दिली आहे. ही प्रक्रिया मुख्याध्यापकांच्या समक्ष पारदर्शक पद्धतीने राबवली गेली. संच मान्यतेनुसार ज्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे अतिरिक्त ठरतात. त्यांचे समायोजनही केले जाणार आहे. यासाठी संबंधित शाळा व संस्था स्तरावरून सर्व कर्मचाऱ्यांचे लेखी म्हणणे व आक्षेप विचारात घेतले जातील.
बिंदू नामावली, पडताळणी नोंदवही, सेवाजेष्ठता व माध्यमिक विभागातील विषय शिक्षकांची उपलब्धता या निकषांवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरीय समायोजन होणार आहे. या प्रक्रियेमुळे आश्रमशाळांमधील शिक्षक-शिक्षकेत्तर पदांचे नियोजनात अधिक सुसूत्रता येणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे.
जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील संच मान्यता देताना मागील वर्षाीचा २० ऑक्टोबर या दिवशीची विद्यार्थ्यांची उपस्थितीची संख्या लक्षात घेेण्यात आली. ही संच मान्यता देताना सर्वच ९७ शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची उपस्थिती होती. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राबवली. अतिरिक्त झालेले शिक्षक व कर्मचारी यांचे लेखी म्हणणे घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.- गणेश सोनटक्के, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सोलापूर