सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा पहिला हप्ता उचलूनही अद्याप बांधकामाला सुरुवात न करणाऱ्या ३८ हजार लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक कार्यालयांकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण एक लाख १ हजार ४८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ९४ हजार ४५८ लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. निधी पाठीशी असतानाही अद्याप सुमारे ३८ हजार लाभार्थ्यांनी घरकुलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवातच केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, एकीकडे तब्बल २२ हजार ९०० लाभार्थ्यांनी आपले हक्काचे घरकुल पूर्ण करून योजनेचा यशस्वी लाभ घेतला आहे. मात्र, दुसरीकडे निधी मिळूनही काम न करणाऱ्या ३८ हजार लाभार्थ्यांमुळे योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण होत आहे.
आकडे बोलतात
l एकूण मंजूर घरकुले : एक लाख एक हजार ४८
l पहिला हप्ता प्राप्त लाभार्थी : ९४ हजार ४५८
l पूर्ण झालेली घरकुले : २२ हजार ९००
l काम न सुरू केलेले लाभार्थी : ३८ हजार
ज्या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊनही विनाकारण काम थोपवून ठेवले आहे. त्यांनी तत्काळ बांधकाम सुरू करावे. अन्यथा त्या लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.- चंद्रशेखर जगताप, प्रकल्प संचालक