सोलापूर : शहरातील विविध नागरी समस्यांची गांभीर्याने दखल घेत महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज समाचार चौक ते कन्ना चौक, कन्ना चौक परिसर तसेच जोडबसवण्णा चौकातील जमखंडी पुलाजवळ प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यांवर बेकायदा व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
यावेळी प्रभागाचे नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील, नगरसेविका वाहिदाबानो शेख, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, बिपीन धुम्मा, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार, कनिष्ठ अभियंता चेतन प्रचंडे, कनिष्ठ अभियंता श्रीदेवी गुत्ती, आरोग्य निरीक्षक धनशेट्टी यांसह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समाचार चौक ते कन्ना चौक दरम्यान टाकण्यात आलेल्या अंडरग्राउंड लाईट केबलवरील युटिलिटी चेंबरची दुरवस्था लक्षात घेऊन आयुक्तांनी पाहाणी केली. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेली किंवा योग्यरित्या बसवलेली नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रभागातील नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व चेंबर दुरुस्त करण्याचे आदेश दिले. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच नागरिकांनी तक्रारी थेट महानगरपालिकेच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदवाव्यात, असे आवाहन केले आहे.
त्यानंतर जोडबसवण्णा चौकातील जमखंडी पुलाजवळील नाल्याची पाहणी करत आयुक्तांनी नाल्यात पारंपरिक पाईपऐवजी बॉक्स कल्व्हर्ट पद्धतीने नवीन पूल उभारण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहून कचरा अडकणार नाही आणि परिसरातील दुर्गंधी व अस्वच्छता कमी होण्यास मदत होईल. या कामासाठी आमदार निधीतून तरतूद उपलब्ध असून निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कामादरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले.