सोलापूर : सरस्वती चौक ते रामलाल चौक मार्गावर ग्राहकांना विनापरवाना मद्य पिण्यास देण्याऱ्या हॉटेल चालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यामध्ये हॉटेल चालक व ग्राहकांसह २१ जणांना अटक करण्यात आली.
पोलिस कल्याण केंद्रासमोर तीन ते चार हॉटेलमध्ये ग्राहकांना विनापरवानगी मद्य पिण्यास देण्यात येत होते. गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरु होता. गुरुवारी (दि.४) रात्री राज्य उत्पादन शुल्क, शहर पोलिस, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई झाली. राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव या स्वतः कारवाईत सहभागी झाल्या. तेथील हॉटेल जगदंबा, हॉटेल जगन्माता, हॉटेल नटराज यांच्यासह इतर नाव नसलेल्या हॉटेलवर ही कारवाई झाली.
यावेळी २२ लोखंडी टेबल, २१ लोखंडी बाकडे, १ काउंटर टेबल, १० लाकडी टेबल, २० लाकडी बाकडे जप्त करण्यात आले. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क खात्याने धाडी टाकून एकूण ३. ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.